एमपीएससी परीक्षा स्थगित केल्याने नागपुर , पुणे , कोल्हापुर , औरंगाबाद येथिल उमेदवारांचा उद्रेक

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे.

पुणे , नागपुर , कोल्हापुर, औरंगाबाद येथे याचाच उद्रेक पाहायला मिळाला. हे उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

एमपीएससी परीक्षा स्थगित केल्याने पुण्यात उमेदवारांचा उद्रेक
उमेदवार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पण विद्यार्थी मागे हटायला तयार नव्हते. ही परीक्षा एक-दोन नव्हे तर आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. २०२० मध्ये ही पूर्व परीक्षा होणार होती. पण करोना संक्रमण स्थितीमुळे ही पुढे ढकलण्यात आली.

आयोगाचं म्हणणं काय?

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. या पत्रात असं म्हटलं होत की, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.

राज्यात बँकिंगच्या परीक्षा, यूपीएससी परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा होत आहेत, तर केवळ एमपीएससीचीच परीक्षा आयोजित न करण्यामागे काय कारण आहे, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. करोना संक्रमण आहे तर भलेही या उमेदवारांना पीपीई किट घालून परीक्षा देऊ द्या, पण परीक्षा रद्द करू नका, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली.

Print Friendly, PDF & Email
Share