ग्राम स्वच्छता करुन नवरदेव निघाला वरातील, भजेपार येथील स्तुत्य उपक्रम

सालेकसा◼️ रविवारचे दोन तास गावासाठी, गावच्या समृद्धीसाठी’ या अभिनव संकल्पनेतून सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे दर रविवारी ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातंर्गत रविवार, 27 मार्च रोजी याच मोहिमेत चक्क नवरदेवाने सहभागी होऊन गावकर्‍यांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

मोहिमेच्या चौथ्या आठवड्यात स्वच्छता दुत भजेपार अंतर्गत माताटोला येथे दाखल होताच तेथील तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. दरम्यान नागरिकांचा आणि विशेषतः युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील हनुमान मंदिर पासून माताबोडी परीसर तथा बोरवेल आणि विहिरीचे ओटे स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती घालण्यात आली. या मोहिमेत युवकांसह नवरदेव यशवंत चुटे हा युवकही सहभागी झाला. तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले. लग्नाला जाण्यापूर्वी स्वच्छतेला प्राधान्य देणार्‍या या युवकाने जणू गावकर्‍यांना स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले.

यावेळी सरपंच चंद्रकुमार बहेकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू बहेकार, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम मेंढे, रवीशंकर बहेकार, रोजगार सेवक गोपाल मेंढे, रेवत मेंढे, लोकेश चुटे, गोविंद मेंढे, यादोराव मौजे, वसंत हेमणे, मंगेश मेंढे, शुभम खोटेले, रमेश बहेकार, विकास नागपुरे, सुरेश सापकने, नंदकिशोर कठाने, राजेश वाकले, विरेंद्र वाकले, प्रमोद मौजे, सुनील फुंडे, सुरेश गायधने, बालिकचंद मेश्राम, धनराज रहिले, अनुराग वाढई, देवेंद्र हेमने, दुर्गेश महारवाडे, अरविंद महारवाडे, मुलचंद चुटे, हंसराज बहेकार आदी उपस्थित होते. प्रत्येक आठवड्याला रविवारच्या सुट्टीचा दिवस सत्कार्यासाठी घालण्याच्या उद्देशाने कुठल्याही एका परिसराची निवड करून गावातील युवक व नागरिक ग्राम स्वच्छता अभियान राबवत असून या मोहिमेला आता हळूहळू लोक चळवळीचे स्वरूप येत असल्याचे बोलले जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share