गोंदियातील शिक्षण सेवक वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत

गोंदिया ◼️शिक्षण सेवकांच्या मानधनात राज्यशासनाने नुकतीच वाढ केली. वाढीव मानधन जानेवारी 2023 पासून देण्याची सूचना सर्व शिक्षणाधिकारी यांना राज्याच्या शिक्षण संचालकांनी केली. मात्र गोंदियातील शिक्षण सेवकांना वाढीव मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. येथील यंत्रणेने शासन परिपत्रकाला ठेंगा दाखवला असल्याची भावना जिल्ह्यातील शिक्षण सेवकांमध्ये असून शिक्षण विभागाविरोधात शिक्षण सेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासकीय, निमशासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये 3 वर्षासाठी शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या विशिष्ट मानधनावर केल्या जातात. त्यांना तुटपूंजे मानधन मिळते. 3 वर्ष अल्पशः मानधनावर सेवा दिल्यानंतर यांना कायम केले जाते. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने नुकतीच शिक्षण सेवकांच्या मानधनाम भरघोष वाढ केली. प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधन 6 हजारवरुन 16 हजार, माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचे 8 हजारांवरुन 18 हजार, उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे 9 हजार रुपयांवरुन 20 हजार, ग्रंथपाल 2500 रुपयांवरुन 14 हजार, प्रयोगशाळा सहाय्यकांचे 2500 वरुन 12 हजार, लिपिक सेवक 2 हजार वरुन 10 हजार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी (अनुकंपा तत्वावर) 1700 वरुन 8 हजार रुपये मानधन केले. जानेवारी 23 पासुनच वाढीव मानधन देण्याचे आदेश शानाने शिक्षण विभागाला दिले.

राज्याच्या शिक्षण संचणालयाने सर्व शिक्षणाधिकारी यांना जारी केले. यानुसार जिल्ह्यात सेवकांना जानेवारीपासून वाढीव मानधन मिळणे अपेक्षित होते. मात्र येथील यंत्रणेला शासन पत्रकाचा विसर पडल्याचे दिसून येते. सातारा, नागपुर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नाशिक, बुलढाणा या जिल्ह्यात आदेश काढण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील संबंधित अधिकार्‍यांनी अजूनही आदेश न काढल्याने सेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

प्राथमिक विभागात 21 शिक्षण सेवक कार्यरत होते. त्यांना तीन वर्षे पूर्ण झाल्याने पदस्थापना देण्यात आली आहे. सहा किंवा सात शिक्षण सेवक अनुकंपा तत्वावर घेण्यात आले असून त्यांचे वाढीव मानधनाचे देयक वेतन पथकाकडे पाठविण्यात आल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजबे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share