रासायनिक द्रव्यातून नोटा दुप्पटीचे आमिष देऊन फसवणूक

गोंदिया कमी अवधीत, कमी गुंतवणुकीत पैसे जादा करुन देण्याचे आमिष देवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र रासायनिक द्रव्यात नोटा बुडवून ठेवल्यास दुप्पट करुन देण्याचे आमिष देवून लुबाडणूक केल्याची घटना 24 मार्च रोजी कोरणी घाट परिसरात समोर आली. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

कोरणी घाट येथे 24 मार्च रोजी सातोना येथील दिपांशू ब्रिकचंद उरकुडे यांना काही अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळील रासायनिक द्रव्यात नोटा बुडवून ठेवल्यास दुप्पट होत असल्याचे आमिष दिले. दरम्यान उरकुडे यांना त्यांना आपल्याजवळील 10 हजार रुपये दिले. अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळील रासायनिक द्रव्यात नोटा बुडविल्या व काही वेळाने एक बंडल त्यांना देऊन 2 तासाने बंडल उघडल्यास दुप्पट रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. दरम्यान उरकुडे यांनी दोन तासांनी बंडल उघडले असता त्यात नोटाच्या आकाराचे कोरे कागद आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने शहरातील बालाघाट टी येथे सापळा रचला. यादरम्यान पोलिसांना संशयास्पदरित्या आढळलेल्या सीजी 12, आर 7194 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातील व्यक्तींनी चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबुल केला.

याप्रकरणी पोलिसांनी पिंटूकुमार सुंदरलाल बारमाटे (32, रा.मलाजखंड), दुर्गेश सिताराम मरसकोल्हे (30, रा. बंजारीटोला), सियाराम महिपाल चौधरी (42, रा. सतोना), राजेश अमरलाल नेवारे (30, रा. बालाघाट व विष्णू बाबुलाल पंधरे (42 रा.पारगाव) यांना अटक केली व त्यांच्या ताब्यात 10 हजार व चारचाकी वाहन जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सरवदे, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, सहायक फौजदार अर्जुन कावळे, पोलिस हवालदार चित्तरंजन कोडापे, इंद्रजित बिसेन, पोलिस शिपाई संतोष केदार, स्मिता तोंडरे यांनी परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share