धक्कादायक! पीएम किसान योजनेतून २० लाख अपात्र लाभार्थ्यांना १,३६४ कोटींचे वाटप

प्रहार टाईम्स
गोंदिया11 : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळणाऱ्यांमध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती मागविली होती. सन २०१९ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. लघु व मध्यम शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. या योजनेसंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. 

अपात्र लाभार्थ्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एक गट अपात्र शेतकरी व आणि दुसरा गट प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली. अपात्र लाभार्थ्यांपैकी ५५.५८ टक्के प्राप्तिकर भरणारे शेतकरी आहेत. उर्वरित ४४.४१ टक्के शेतकरी हे अपात्र शेतकरी गटात मोडणारे आहेत. या अपात्र शेतकऱ्यात पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, असेही यात सांगितले गेले आहे. 

पंजाबमधील ४.७४ लाख, आसाम ३.४५ लाख, महाराष्ट्र २.८६ लाख, गुजरात १.६४ लाख, तर उत्तर प्रदेशमधील १.६४ लाख शेतकरी अपात्र लाभार्थी ठरले आहेत. सिक्कीममध्ये एका शेतकऱ्यास चुकीचा लाभ मिळाला. दोन हजार रुपयांप्रमाणे ६८.२० लाख हप्ते देण्यात आले होते त्यातून १,३६४.१३ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांना मिळाले. ४९.२५ लाख हप्ते प्राप्तिकर भरणाऱ्यांना तर १८.९५ लाख हप्ते अपात्र लाभार्थ्यांना मिळाले.

अशाच प्रकारची महाराष्ट्र राज्याची माहिती व अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भुपेंद्र मस्के यांनी महाराष्ट्रात शासनाला केली होती. हे विशेष

Print Friendly, PDF & Email
Share