कचारगड यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करा : कर्नल सुपनेकर

सालेकसा◼️यावर्षी 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान कचारगड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला विविध राज्यातून भाविक येत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान, गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे, अशा सूचना सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर यांनी दिल्या.

सालेकसा तालुक्यात आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड देवस्थानात 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला देशभरातील आदिवासी भाविक लाखोंच्या संख्येते येतात. या यात्रेच्या व्यवस्थापन सांभाळणार्‍या विविध विभागाच्या कार्यशाळेत ते धनेगाव येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर अर्जुनी मोरचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा पुरवठा अधिकारी लिना फलके यावेळी मंचावर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, यात्रे दरम्यान अचानकपणे कुठलीही आपत्ती येऊ शकते. चार भागात विभागनी करुन प्रत्येकाचे नोडल अधिकारी नेमून गर्दीचे व्यवस्थापन केले तर यात्रा सुलभरित्या पार पाडण्यास मदत होते. यात्रे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे. त्यामुळे अग्नीशमन दल, आरोग्य विभाग, औषध व अन्न पुरवठा, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग व पोलीस विभागानी सतर्क राहून काम करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले, भाविकांना योग्य त्या सोई-सुविधा पुरविण्यात याव्यात. लाईटची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असून त्याला बॅकअप (जनरेटर) असणे गरजेचे आहे. पोलीस विभागाने आपातकालीन पथक तयार ठेवावे, दुकानदारांची नाव नोंदणी करुन नागरिकांना होणार्‍या भोजनदानातील अन्नाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था तसेच अग्नीशमलन दलची व्यवस्था करण्यात यावी. ज्या ठिकाणी धोकादायक रस्ता आहे त्या ठिणाणी बॅरिकेटींगची व्यवस्था करण्यात यावी. पार्कींगची व्यवस्था सुनियोजित करणे गरजेचे आहे. यात्रा सुलभरित्या पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. यात्रेदरम्यान कुठल्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. ज्या विभागाला जबाबदारी दिलेली आहे त्यांनी आपली जबाबदारी अचुकपणे पार पाडावी. प्रत्येक विभागाने आपसात समन्वय ठेवणे गरजेचे आहे, असे कर्नल सुपनेकर यांनी यावेळी सांगितले. कार्यशाळेस अर्जुनी मोरचे तहसिलदार विनोद मेश्राम, गोंदियाचे अपर तहसिलदार अनिल खडतकर, सालेकसाचे तहसिलदार डी. एम. मेश्राम, ठाणेदार जनार्दन हेगडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय बिसेन यांचेसह जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कचारगड देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन करुन आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share