गोंदियात गांजा व्यवसाय फोफावला, 11 लाखांचा गांजा जप्त

३ तस्करांना अटक

गोंदिया : शहरातील गड्डाटोली परिसरातील झोपडी मोहल्ल्यातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 75 किलो गांजा जप्त केला आहे. याची किंमत 11 लाख 32 हजार 245 रुपये आहे. ही कारवाई 30 जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आली असून या प्रकरणी तीन गांजा तस्करांना अटक करण्यता आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस गांजा व्यवसाय फोफावत चालला आहे. शहरातील अनेक भागात गांजा खुलेआम विक्री करण्यात येत आहे. या गांजाच्या आहारी अल्पवयीन मुले जात आहेत. त्यामुळे शहरात चोरी, भांडण, खून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. उडीसा व आंध्र प्रदेश येथून गोंदिया जिल्ह्यात गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील गड्डटोली परिसरातील झोपडी मोहल्ल्यातील एका घरात गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी 30 जानेवारी रोजी सायंकाळी धाड टाकली. यावेळी 75 किलो गांजा त्यांना आढळून आला. पोलिसांनी 75 किलो 483 ग्राम गांजा किंमत 11 लाख 32 हजार 245 व इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत ३ हजार रुपये असा एकूण 11 लाख 35 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी शुभम (वय 20, रा. पुनाटोली), मनिष (वय 25, रा. गांधी वॉर्ड) व आकाश उर्फ टेंपो उर्फ छोटू (रा. कन्हारटोली) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध भादंवि कलम 8 (क) 20, 29 एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share